पत्रलेखनात कोण कोणते भाग येतात?www.marathihelp.com

कोणत्याही खाजगी वा व्यावसायिक पत्राचे स्थूलमानाने पाच घटक असतात. (१) पत्रशीर्ष : पत्रलेखकाचे नाव, पत्ता व पत्राची तारीख हा तपशील सामान्यत: पत्राच्या वर उजव्या कोपऱ्यात लिहिण्याची पद्धत आहे.

कोणत्याही खाजगी वा व्यावसायिक पत्राचे स्थूलमानाने पाच घटक असतात. (१) पत्रशीर्ष : पत्रलेखकाचे नाव, पत्ता व पत्राची तारीख हा तपशील सामान्यत: पत्राच्या वर उजव्या कोपऱ्यात लिहिण्याची पद्धत आहे. हाच मजकूर यापेक्षा वेगळ्या रीतीने कलात्मक छपाई करून अशी छापील पत्रशीर्षे वापरण्याची पद्धत रूढ आहे. पत्राच्या वरच्या टोकाला अगदी मधोमध सुभसूचक असा ‘श्री’ वा तत्सम निर्देश लिहिण्याची प्रथा आढळते (२) सुरुवातीचा मायना: खाजगी पत्रातील मायने हे पत्रलेखक-पत्रवाचक यांच्या कौटुंबिक नात्यांवर किंवा इतर प्रकारच्या संबंधावर अवलंबून असतात. पारंपरिक पत्रलेखनात आईवडिलांना तीर्थरूप, इतर वडीलधाऱ्यांना तीर्थस्वरूप, कनिष्ठ व्यक्तीस चिरंजीव, बरोबरीच्या मित्रमैत्रिणींना प्रिय असे संबोधून त्याखाली कृतानेक शिरसाष्टांग दंडवत किंवा नमस्कार, अनेक आशीर्वाद, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष यांसारखी अभिवादनपर वचने योजतात. आधुनिक पत्रलेखनात सामान्यतः ज्येष्ठांना सादर व समवयस्कांना व कनिष्ठांना सप्रेम नमस्कार एवढाच मायना पुरतो. तीर्थरूप व तीर्थस्वरूप ही आदरार्थी वचने मात्र आधुनिक पत्रलेखनात टिकून आहेत तथापि ‘प्रिय’ हेच संबोधन सर्रास वापरण्याची प्रथा बहुधा ‘डियर’ या इंग्रजी मायन्याच्या अनुकरणाने लोकप्रिय झालेली दिसते. 

व्यावसायिक पत्रांचे मायने औपचारिक असतात. ‘महोदय’- सारखा निर्देश त्यात पुरेसा असतो. मायना लिहिण्याच्या पूर्वी पुष्कळदा पत्राचा विषय आणि पूर्वकालीन पत्राचा संदर्भ एकाखाली एक देण्याची पद्धत आढळते (३) मसुदा : हा पत्राच्या मजकुराचा भाग असतो. सामान्यपणे सुस्पष्टता, समर्पकता, संपूर्णता, सविनयता, संक्षिप्तता, संभाषणात्मकता व समंजसपणा असे सप्त ‘स’ गुण पत्राच्या मजकुरात असावेत अशी अपेक्षा असते (४) समाप्तीचा मायना : पत्राचा मजकूर समाप्त झाल्यावर स्वतःची स्वाक्षरी करण्यापूर्वी पत्रलेखकाला समाप्तीचा मायना लिहावा लागतो. आईवडिलांना व इतर वडीलधाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा शेवट पुष्कळदा ‘आपला आज्ञाधारक’ या वचनाने केला जातो. याशिवाय ‘आपला’, ‘आपलाच’, ‘तुझा’, ‘तुझाच’, ‘आपला स्नेहांकित’, ‘आपला स्नेहाकांक्षी’ असेही समाप्तिचे मायने वापरले जातात. व्यावसायिक पत्रलेखनात ‘आपला’, ‘आपला विश्वासू’ यांसारखे प्रयोग केले जातात (५) स्वाक्षरी : पत्राच्या शेवटी उजव्या बाजूला खाली पत्रलेखकाची स्वाक्षरी असते. 

परिणामकारक पत्रलेखन करणे, ही एक कला मानली जाते. पत्रलेखनासाठी वापरण्याचा कागद वा छापील पत्रशीर्षे, टपाल खात्याकडून उपलब्ध होणारी कार्डे अंतर्देशीय पत्रे व पाकीटे यांतून योग्य त्या प्रकाराची करावयाची निवड, पत्रलेखनातील हस्ताक्षर, भाषाशैली, मसुद्यातील परिच्छेदयोजना, पत्र हस्ताक्षरात लिहावयाचे की टंकलिखित करून घ्यावयाचे याचा विवेक व पत्रावर पत्ता लिहिण्याची पद्धती यांसारख्या अनेक दृष्टींनी परिणामकारक पत्रलेखनाचा विचार करण्यात येतो. या सर्व अंगोपांगांचा काटेकोर विचार करणारे पत्रलेखनाचे एक शास्त्रच जणू आधुनिक काळात उदयास आले आहे. तथापि या तथाकथित शास्त्राचा उपयोग व्यावसायिक पत्रलेखनास जितका आहे, तितका तो खाजगी पत्रलेखनास नाही. शिवाय चांगल्या व प्रभावी पत्रलेखनाच्या कल्पना कालमानानुसार सतत बदलत गेलेल्या दिसतात. याशिवाय पत्रलेखन हे अखेरपक्षी व्यक्तिगत लेखन असल्याने त्यात पत्रलेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सर्वच बाबतींत उमटणे स्वाभाविक असते. विशेषतः खाजगी पत्रलेखनातून पत्रलेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन अपरिहार्यपणे घडते व ते घडावे अशीच अपेक्षाही असते. व्यावसायिक पत्रलेखन हे प्राधान्याने औपचारिक असल्याने, त्यात ठराविक तोच तोपणा सर्वच बाबतींत जाणवतो. तरीही काही व्यावसायिक पत्रलेखन हेही पत्र लिहिणाऱ्या संस्थेच्या वा संस्थाचालकांच्या विशिष्ट दृष्टिकोनाचा प्रभाव जाणवून देतात. प्रकाशित खाजगी पत्रव्यवहारही सर्वांना वाचनीय व उद्‌बोधक ठरतो. तोही व्यक्तिविशिष्ट अशा त्यातील गुणवत्तेमुळेच. 

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 5195 +22