मार्क्सवादी दृष्टिकोनाचा समर्थन कोण आहे?www.marathihelp.com

मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वीसुद्धा समाजसत्तावाद प्रचलित होऊ लागला होता. औद्योगिक क्रांती झाली आणि वाढत्या उद्योगाबरोबर कामगारांची व सामान्य जनतेची परिस्थिती अधिकाधिक हलाखीची बनत गेली. तेव्हा म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात समाजसत्तावादाचा उदय व प्रसार झाला.

त्या वादाचा इंग्‍लंड व फ्रान्समध्ये अनेक नामवंत विद्वानांनी व समाजधुरीणांनी जोरदार पुरस्कार केला. त्या विचारवंतांमध्ये रॉबर्ट ओएन, चार्ल्स फौरिएर, प्रूदाँ, सेंट सायमन वगैरे प्रमूख होते. त्या विचारांना कार्लाइल, डिकन्स, रस्किन आदी लेखकांचाही पाठिंबा होता. या समाजसत्तावादाच्या प्रणेत्यांनी केवळ समाजसत्तावादी समाजाचे भव्य चित्र रेखाटले. तो अस्तित्वात आणण्याचा शास्रशुद्ध मार्ग दाखविला नाही. म्हणून त्यांना यूटोपिअन (अस्थिता दर्शवादी) म्हटले जाते. टॉमस मोर याने सोळाव्या शतकात आपल्या यूटोपिया या पुस्तकात एका आदर्श समाजाचे चित्र रेखाटले, त्यावरून हा शब्द रूढ झाला.


मार्क्सने आपल्या पूर्वीच्या समाजसत्तावाद्यांची कल्पनाविश्वात रमणारे म्हणून हेटाळणी केली व त्याची विचारापेक्षा आपला विचार वेगळा आहे, हे दाखवण्यासाठी त्याला शास्रीय वा वैज्ञानिक हे विशेषण लावले. मार्क्सचा विचार वेगळा आहे हे खरे, पण तोच केवळ एक समाजसत्तावादी विचार आहे, अशी जी समजूत करून देण्यात आली ती मुळीच खरी नाही. मार्क्सपूर्व विचारातही समाजसत्तावाद आहेच आणि त्यातील नीती व न्याय यांवरील भर जर मार्क्सवादात अंतर्भूत झाला असता, तर मार्क्सवाद अधिक कल्याणकारक ठरला असता.

मार्क्सवाद एकोणीसाव्या शतकात वाढला. त्याचे पहिले विशदीकरण १८४८ साली प्रसिद्ध झालेल्या साम्यवादी जाहीरनाम्यात (द कम्यूनिस्ट मॅनिफेस्टोत) आढळते. जाहीरनामा मार्क्स व एंगेल्स दोघांनी मिळून लिहीला; पण त्यात मार्क्सचाच अधिक हात होता. या सुमारास भांडवलशाहीचा यूरोपमधील अनेक देशांत विकास होऊन तिची गोड व कटू फळे समाजाच्या पदरात पडू लागली होती; गोड फळे वरिष्ठ वर्गाच्या हाती, तर कडू फळे श्रमजीवी सामान्य जनतेच्या हाती. कामाचा दिवस शक्यतितका वाढवून आपल्या मर्जीनुसार कामवर लावलेल्या मजूराला पगार देणे व आपला नफा वाढवणे हे भांडवलदारांचे धोरण होते.

या व्यवस्थेविरुद्ध कामगारांमध्ये तीव्र असंतोष मजला होता. तो असंतोष फुलवून त्याचे क्रांतिकारक उठावात रूपांतर करता येईल, अशी मार्क्सची, त्याच्या मित्रांची व इतर समाजवाद्यांची कल्पना होती. १८४८ हे युरोमधील क्रांतीचे वर्ष. त्यावर्षी यूरोपमधील अनेक देशांत क्रांतीकारक उठाव झाले. त्या उठांवात सामील होण्याचे आवाहन साम्यवादी जाहीरनाम्याने कामगारांना केले. जाहीरनामाच्या शेवटी मार्क्स लिहीतो, “जगातील कामगारांनो, एक व्हा; शृंखलांखेरीज तुमच्या जवळ गमावण्यासारखे असे दुसरे काही नाही.” जाहीरनामा मार्क्सने पूर्व वयात लिहिला असला, तरी मार्क्सवाद म्हणून नंतर प्रसिद्धी पावलेल्या विचारप्रणालीची सर्व प्रमूख तत्त्व त्याच्यामध्ये दृष्टीस पडतात.

उत्तर वयात त्या तत्त्वांचा परिपोष करणारी मार्क्सने अनेक विद्वत्ता प्रचुर पुस्तके व पुस्तिका लिहिल्या. त्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो तीन खंडी कॅपिटल हा ग्रंथ. फर्स्ट इंटरनॅशनलने (इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशनने) कॅपिटल ग्रंथ कामगार वर्गाचे बायबल म्हणून गौरविला. पहिला खंड मार्क्सच्या आयुष्यात १८६७ या वर्षी प्रसिद्ध झाला. पुढचे दोन खंड त्याच्य मृत्यूनंतर एंगेल्सने प्रसिद्ध केले. या ग्रंथात भांडवलशाहीच्या उत्पत्तीचा व विकासाचा शास्रशुद्ध अभ्यास असून तिच्या अंगभूत गुणधर्माप्रमाणे ती कामगारांचे वाढते शोषण कसे करते व त्यामुळे इतिहासक्रमानुसार येणाऱ्या पुढच्या अवस्थेला म्हणजे क्रांतीला समाज कसा तयार होतो, ते दाखवले आहे.

याखेरीज अनेक महत्त्वाची लहानमोठी पुस्तके व पुस्तिका त्याने व त्याचा सहकारी मित्र फ्रीड्रिख एंगेल्स (१८२०–१८९५) याने साम्यवाद व तत्संबंधी विषयांवर लिहिली. याखेरीज त्याचे त्या त्या प्रसंगांना धरून लेख, पुस्तीका व पत्रव्यवहार आहे. यामध्ये एंगेल्सच्या पुस्तकांचाही समावेश होतो; कारण मार्क्सवादाच्या उभारणीत मार्क्सइतकाच त्याचाही हात होताच. हे सर्व लिखाण मूळ जर्मनमध्ये लिहिले गेले. फ्रेंच आणि इंग्रजीमध्ये त्याची भाषांतरे झाली. जगातील सर्व प्रमूख भाषांमध्येही त्याचे अनुवाद प्रसिद्ध झाले.

मार्क्सवाद रशियन बोल्शेविक क्रांती झाल्यानंतर सबंध जगभर पसरला आहे. ज्या देशांत मार्क्सवादी क्रांती झाली, तिथे म्हणजे सोव्हिएट युनियन, पूर्व यूरोपियन साम्यवादी राष्ट्रे, चीन आणि क्यूबा येथे त्याला सर्वश्रेष्ठ धर्माची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तिथे मार्क्सवादावर टीका करणे अगर त्याच्यातील उणिवा दाखवून देणे राज्यविरोधी वा समाजविघातक कृत्य समजले जाते. मार्क्सवादाचा केल्याखेरीज तिथे कुणालाही राजकारणात किंवा समाजकारणात स्थान लाभत नाही. सर्व साम्यवादी देशांत आज ही परिस्थिती आहे.

साम्यवादी देशांत व पक्षात मार्क्सवादाचा अभ्यास चालू आहे. तो श्रद्धेने, भावभक्तीने आणि कडक शिस्तीखाली. पण इतरत्र म्हणजे भांडवलशाही जगातही अर्थशास्रज्ञ, तत्त्ववेत्ते, वैज्ञानिक व राजकरणी यांच्यामध्ये मार्क्सवादाचा अभ्यास चालू आहे. सर्वांना तो पटतोच असे नाही, काहींना त्याच्यामध्ये मानवी जीवनाचा आदर्श दिसतो व प्रेरणा मिळते, काहींना त्याची मूळ भूमिका व दृष्टी विपर्यस्त आहे असे वाटते, काहींना त्याचे विवेचन व सिध्दांत बिनबुडाचे आहेत असे आढळते.
युक्तिवाद

तर काहींना मार्क्सने हेटाळणी केलेला कल्पनाजगातील आदर्शवाद वा यूटोपिआ पुन्हा मार्क्सवादामध्ये निराळ्या युक्तिवादावर आधारलेला-अवतरलेला आहे असे दिसते. अशा तऱ्हेची अनुकूल वा प्रतिकुल व अर्धवट अनुकूल व प्रतिकुल टीका आज मार्क्सवादावर काही थोडे साम्यवादी देश सोडले, तर संबंध जगभर चालू आहे. शंभरदीडशे वर्षे होऊन गेली, तरी मार्क्सवादाबद्दलचे कुतूहल संपले नाही, हे एक त्याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. कारण जगाच्या राजकारणात त्याला वैशिष्ट्यपूर्णस्थान प्राप्त झाले आहे.

मार्क्सवादाचे अनेक पैलू आहेत, त्यापैकी आर्थिक व राजकिय अधिक गाजले, तरी मूलभूत आहे तो तत्त्वज्ञान हा त्याच्या अभ्यासाचा मूळ विषय. अर्थकारणाला व राजकारणाला तात्त्वीक बैठक हवी, असा त्याचा आग्रह होता. त्याने जी बैठक सुचविली ती भौतीकवादाची. मार्क्स हा हेगेलचा उत्तम अभ्यासक होता. त्याचा विरोध-विकासवाद त्याला पटला; पण हेगेलच्या विचारमंथनाचा मूळ पाया जो केवळ तत्त्वचैतन्यवाद वा भाववाद, तो त्याला पटला नाही. केवळ चैतन्य मूळ नसून भूत वस्तू किंवा जड द्रव्य (मॅटर) मूळ आहे,

असा त्याचा आग्रह होता. ही भूत वस्तू स्थिर व स्थाणू नसून ती सतत बदलणारी, सदैव गतिमान असते. या वस्तूंच्या व्यापारातून वा विरोध-विकासातून विश्व निर्माण होऊन प्रणी व नंतर मनुष्य निर्माण झाला, मनुष्यांनी समाज निर्माण केला. भौतीक जीवनाची भौतीक साधने निर्माण करीतच मनुष्य जगतो; निर्माणपद्धती जशी असते तसे विशिष्ट सामाजिक संबंध निर्माण होतात. उत्पादनपद्धती बदलते त्याबरोबर सामाजिक संबंध बदलतात; म्हणजे समाजिक वर्ग बदलतात. उत्पादनपद्धती व सामाजिक विशिष्ट संबंध हा भौतिक सामाजिक पाया; हा पाया जसा असेल त्या प्रकारच्या मानसिक संस्कृतीचा इमला उभारला जातो; कायदा राज्यव्यवस्था, काव्य कला, साहित्य, धर्म इ. मानसिक संस्कृतीत समाज आदी अवस्थेपासून अनेक रूपांतरे होत बदलत गेला आहे.
मार्क्सची तत्त्वज्ञाबद्दलची भूमीका

समाज मनुष्यनिर्मित असल्याकारणाने योग्य ऐतिहासिक परिस्थितीत मनुध्ये तो बदलू शकतात. म्हणून योग्य परिस्थिती निर्माण करून कामगारवर्ग भांडवलशाहीतून समाजसत्तावादी समाज निर्माण करू शकतील, असा हा सर्वसाधारणपणे मार्क्सचा भौतिकवादी, कार्यशिलतेवर भर देणारा, तात्त्विक दृष्टिकोन आहे. मार्क्सवादाचे अर्थकारण व राजकारण यांना तो पायाभृत आहे. आतापर्यंत तत्त्वज्ञांनी केवळ, जग समजावून घेण्याचा प्रयत्‍न केला; आपली जबाबदारी जग बदलणे ही आहे; ही मार्क्सची तत्त्वज्ञाबद्दलची भूमीका होती. समाजव्यवस्था बदलत असते आणि हा बदल उत्पादनसाधने. उत्पादनपद्धती व त्या पद्धतींत निर्माण झालेले सामाजिक संबंध यांच्या बदलांमुळे घडून येतो; हा मूळ सिद्धांत होय; यालाच ऐतिहासिक भौतिकवाद (हिस्टॉरिकल मटीरिअलिझम) असे म्हणतात. इतिहास घडतो व बदलतो तो भौतीक कारणांमुळे; आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, वस्तूंच्या उत्पादनाची व विनिमयाची साधने व पद्धती बदलल्यामुळे. त्यांमध्ये परमेश्वरी योजना नसते किंवा महान व्यक्तींचे कर्तृत्वही महत्त्वाचे नसते. या सिद्धांतानुसार मार्क्सने त्याच्या काळापर्यंतच्या मानवेतिहासाची संगतीही स्थूलमानाने लावून दाखविली.

अगदी सुरूवातीला जीवनार्थ मनुष्यप्राणी टोळ्या करून भटकत होता. नंतर तो स्थिर समाज बनवून एका ठिकाणी राहू लागला. या काळात वर्गविरहित समताप्रधान समाजव्यवस्था रूढ होती. कारण त्यात सर्व संपत्ती सार्वजनिक होती; तिला मार्क्सने प्राथमिक साम्यवाद (प्रिमिटिव्ह कम्युनिझम) असे नाव दिले आहे. त्यानंतर खाजगी संपत्ती निर्माण होऊ लागली, त्याबरोबर आर्थिक वर्ग निर्माण होऊ लागले; वर्गकलहासही लगेच प्रारंभ झाला. त्यानंतरचा आतापर्यंत जो मानवी समाजाचा इतिहास घडत आला; तो वर्गकलहाचा इतिहास होय. याचे मुख्य उदाहरण यूरोपचा प्राचीन काळापासूनचा इतिहास होय. शेती व कुटीरोद्योग सुरू झाले; खाजगी संपत्ती निर्माण झाली; श्रमिकदासवर्ग तयार झाला; या अवस्थेत उत्पादन बव्हंशी गुलामांकडून करवून घेतलं जात असे. समाजात शांतता स्थापण्याकरिता राज्यसंस्था आली. शेती खाजगी मालकीची झाली; व्यापार वाढला, जमीन हेच त्या काळात उत्पादनाचे सर्वांत प्रमुख साधन होते.

जमिनीचे मालक सत्ताधीश झाले आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली सरंजामशाही वाढली; राजसत्ता बळकट झाली. लाखो शेतमजूर शेतावर काम करत होते. त्यांना मालकीमध्ये भाग नव्हता व मजुरी केवळ पोटापुरती मिळत असे. सरंजामशाहीत व्यापारी वर्ग तयार झाला. महानद्या व सागर यांच्यातून वाहतूक व व्यापार सुरू झाला; व्यापारी वर्ग निर्माण झाला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्पादनसाधनांत तंत्रविज्ञानातील शोधामुळे अभूतपूर्व औद्योगिक क्रांती झाली. व्यापारी भांडवलाचे यंत्रोद्योगाच्या भांडवलात रूपांतर झाले. वाफेच्या शक्तीवर चालणारी अनेक यंत्रे निर्मांण झाली. त्या यंत्रांवर ज्यांनी आपली मालकी प्रस्थापित केली ते समाजामध्ये सत्ताधारी झाले. तेच आजचे भांडवलदार. त्यांनी राजारजवाडे आणि जमीनदार यांना सत्ताभ्रष्ट करकून त्या जागी आपले राज्य प्रस्थापित केले, ही भांडवलशाही क्रांती.

ती वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या वेळी घडून येते. पण इतिहास इथेच थांबला नाही. तो पुढे चाललेला आहे. भांडवलशाहीच्या अंगभूत नियमांनुसार कामगार वर्ग मोठा प्रबळ बनतो; भांडवलदारांना समाजाच्या गरजेस पुरेस उत्पादन वाढवता येत नाही अशी स्थिती उत्पन्न होते, तेव्हा भांडवलशाही उत्पादन-पद्धत समाजाच्या प्रगतीच्या मार्गातील घोंड ठरते व मग कामगारांच्या नेतृत्वाखाली क्रांती होते; राजकीय सत्ता कामगारवर्ग काबीज करतो; लुबाडणारे लुबाडले जातात; समाजवादी क्रांती घडून येते. वर्गहीन समाज अस्तित्वात येतो. राज्यसंस्थेची गरज हळूहळू संपते; राज्यसंस्था सुकत जाऊन गळून पडते. तात्पर्य, इतिहासाच्या शक्तीमुळे विकासाच्या नियमानुसार समाजवाद स्थापन होणे अटळ आहे; असा मार्क्सवादाचा अंतिम निष्कर्ष आहे.
भांडवलशाही अर्थव्यवस्था

वर उल्लेखिलेले भांडवलशाहीचे अंगभूत नियम मार्क्सवादाच्या आर्थिक विचारात आढळतात. त्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे खोल तर्कशुद्ध चिंतन केले. भांडवलशाही उत्पादन नफ्यासाठी होते. उत्पादनाचा सर्व खर्च वजा जाता जे उरेल तो हा नफा होय. म्हणून उत्पादनाचा खर्च कमी करण्याकडे भांडवलदारांचे सदोदित लक्ष असते. मजुरी ही उत्पादन खर्चातील महत्त्वाची बाब असते. विशेष यातायात न करता त्याला ती कमी अगर जास्त करता येते. मजुरी कमी करण्याचा एकच मार्ग नाही, ती कमी करण्यासाठी कामाचे तास अगर गती अगर उत्पादन वाढवता येते. म्हणजे तेवढ्याच मजुरीत कामगारांकडून अधिक काम म्हणजे उत्पादन करवून घेण्यात येते. या ना त्या निमित्ताने कामगारांची संख्याही कमी करता येते. या कामी नवनवीन यंत्रांचा उपयोग होतो. अशा श्रम वाचविणाऱ्या म्हणजे कमी कामगारांकडून अधिक उत्पादन मिळवणाऱ्या यंत्रांच्या शोधात भांडवलदार नेहमीच असतो. श्रमाची उत्पादकता वाढवून नफा मिळविणे हेच उद्योजकाचे मुख्य उद्दिष्ट असते.

कामगाराला जगण्यापुरता आणि कुटुंब निर्वाहापुरता कामगाराच्या श्रमातून निर्माण झालेल्या संपत्तीतला भाग दिला जातो. कामगाराने निर्माण केलेल्या संपत्तीतील उरलेला भाग मालक आपल्याकडे ठेवतो, तोच नफा. नफा म्हणजे शोषण वा पिळवणूक. नफा हेच अतिरिक्त मूल्य. अशा रीतीने स्वतःचा नफा वाढविण्याचे भांडवलदारांचे उद्योग नेहमीच कामगारांच्या मुळावर येतात. स्पर्धेत टिकावयाचे तर असे उद्योग त्यांना सदोदित करावे लागतातच. म्हणजेच सकृतदर्शनीदेखील कामगारांचे व भांडवलदारांचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत. यातूनच तेढ व वर्गकलह सुरू होतो व त्याचे पुढे वर्गयुद्धात रूपांतर होते. मार्क्सवादामध्ये वर्गकलह आणि वर्गयुद्ध यांना मोठे महत्त्वाचे स्थान आहे. वर्गकलहामुळेच मानवसमाजाचा इतिहास घडतो, अशी मार्क्सची धारणा आहे. साम्यवादी जाहीरनाम्यात त्याने म्हटले आहे की, आतापर्यंतचा समाजाचा सर्व इतिहास वर्गकलहांचा इतिहास आहे. भांडवलशाही जगात वर्गकलह सतत वाढतच जाणार आहे आणि त्या लकहातूनच क्रांती होऊन समाजवाद निर्माण होणार आहे. हा कलह कसा आणि का वाढत जातो, ते ते मार्क्सने कॅपिटल आदी ग्रंथातून स्पष्टपणे आणि सविस्तर दाखविले आहे

भांडवलशाहीमध्ये उत्पादनाची साधने एका व्यक्तीच्या म्हणजे भांडवलदाराच्या मालकीची असतात. उदरनिर्वाहासाठी कामगाराला काम शोधावे लागते. भांडवलदारच हे काम त्याला देऊ शकतो. म्हणून कामगार त्याला आपली श्रमशक्ती विकतो; श्रमशक्ती ही एक अजब चीज आहे. ती सर्व मूल्य निर्माण करते. शेती श्रमाने निर्माण होते. सर्व उत्पादनसाधने मानवी श्रमाने घडविलेली असतात, उपभोगाची वा जीवनाची सर्व साधने मानवी श्रमातून निर्माण होतात. तात्पर्य वस्तूंमध्ये मूल्य निर्माण होते ते श्रमशक्तीच्या वापरामुळे; यालाच श्रममूल्याचा सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे कामगार आपल्या श्रमांनी सर्व मूल्ये निर्माण करतात; परंतू सर्व मूल्य त्यांच्या हाती येत नाही; त्याचा अल्प भागच येतो. त्याच्या हातात उरते ते फक्त मजुरीच्या रूपाने मिळणारे मूल्य.
अपरिवर्तनिय कायदा

मजुरीचाही अपरिवर्तनिय असा कायदा आहे. मार्क्सने तो डेव्हिड रिकार्डो या इंग्रजी अर्थशास्रवेत्त्याकडून घेतला. या कायद्याप्रमाणे स्वतःच्या व कुटुंबियांच्या जगण्यासाठी –संतती जगविण्यासाठी जरूर तेवढीच मजुरी कामगाराला मिळू शकते. श्रमातून निर्माण झालेल्या मूल्याचे दोन भाग; एक भाग कामगाराचे वेतन व दुसरा शिल्लक भाग म्हणजे अतिरिक्त मूल्य; ते नफा म्हणून उत्पादन साधनावरील मालकीमुळे भांडवदाराच्या पदरात पडते. यांत्रीक शोधामुळे उत्पादन सारखे वाढत जाते; त्यामुळे अतिरिक्त मूल्य वा नफा अधिकाधिक निर्माण होतो. तो पदरात पडल्यामुळे भांडवलदार वर्ग अधिकाधिक श्रीमंत व सामर्थ बनतो आणि कामगार वर्ग व तो यांच्यामधील दरी वाढत जाते.

याचवेळी भांडवलशाहीच्या नियमानुसार इतर काही प्रक्रिया घडत असतात आणि त्यामुळे कामगारांची परिस्थिती अधिकाधिक दयनीय होते. भांडवलाचा संचय वाढणे आणि ते एकत्रित होणे हा भांडवलशाहीचा नियमच आहे. आपसांतील स्पर्धेमुळे छोटे भांडवलदार आणि त्यांचे मोठे उद्योग येतात. यालाच भांडवलदारी स्पर्धा म्हणतात; उलट खाजगी भांडवलातील अनेक भागीदार यांच्यामध्ये सहकार्य होते. नवनवीन यंत्रे आल्यामुळे कामगारांची गरज कमी होते आणि त्यांमधील बेकारी वाढते. यंत्रनिर्मित औद्योगिक उत्पादन वाढल्यामुळे अनेक हस्तव्यवसाय नष्ट होतात व ते चालवणारे कारागीर नोकरीवर जगणारे कामगार बनतात. खेड्यांतूनही कामगारांमध्ये सारखी भर पडत असते. या सर्वांचा मिळून बेकारांचा एक मोठा तांडा तयार होतो आणि त्याचा मजुरीच्या दरावर विपरीत परिणाम होतो. कमी दरात कामगार उपलब्ध होतात.

अशा रितीने समाजामध्ये दोन वर्ग तयार होतात : एक श्रीमंत भांडवलदारांचा आणि दुसरा गरीब आणि दिवसेंदिवस अधिकाधिक गरिब होणाऱ्या कामगारांचा. कालानुक्रमे मधले वर्ग नष्ट होतात वा दुर्बल होतात; आणि भांडवलदार व कामगार हे दोनच वर्ग युद्धाच्या पवित्र्यात एकमेकांसमोर उभे ठाकतात. भांडवलशाही समाजाच्या अखेरच्या परिस्थितीचे हे मार्क्सवादी भविष्य आहे.

वस्तुत कामगारांची गरिबी वाढत जाणे, भांडवलदारांच्याही फायद्याचे नसते. कामगारांची क्रयशक्ती म्हणजे माल विकत घेण्याची कुवत कमी झाली की मालाचा उठाव होत नाही. माल पडून राहतो, मग उत्पादन बंद करावे लागते. यालाच आर्थिक अरिष्ट म्हणतात. असे अरिष्ट दर पाच सात वर्षानी येते. दुसरे अरिष्ट पहिल्या अरिष्टापेक्षा अधिक तीव्र व व्यापक असते. अरिष्ठाच्या या चक्रातून सुटण्यासाठी भांडवलशाही परदेशी बाजारपेठा धुंडाळू लागते. यातूनच वसाहतवाद व साम्राज्यवाद उद्‍भवतो. मग राष्ट्राराष्ट्रांमधील स्पर्धा सुरू होते आणि भांडवलदारी राष्ट्रामधील जागतिक युद्धाची शक्यता निर्माण होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयी होण्यासाठी घरातील, देशातील स्पर्धा बंद करावी लागते.
भांडवलशाहीची चौकट

एकेक महान उद्योदसमूह म्हणजे मक्तेदाऱ्या निर्माण होतात. ही स्पर्धा बंद केली जाते. किंमती चढ्या ठेवण्याकरिता व्यापारी साठेबाजी चालू होते. उत्पादनावर व भावावर नियंत्रणे लादावी लागतात. या अडचणीत सापडलेली भांडवलशाही संख्येने वाढलेल्या कामगारांना पुरेसे काम देऊ शकत नाही व समाजाला हव्या त्या वस्तू रास्त किंमतीत पुरवू शकत नाही. म्हणून भांडवलशाहीची चौकट मोडून त्या पलीकडे जाणे क्रमप्राप्त ठरते.

भांडवलशाहीची चौकट मोडण्याचा व त्या पलीकडे जाण्याचा मार्गही मार्क्सवादाने दाखवून दिलेला आहे. क्रांती अटळ आहे, हा मार्क्सवादाचा सिद्धांत. समाजातील अत्यंत नाडलेला, पिडलेला वर्ग जो कामगारांचा, तो ही क्रांती घडवून आणिल. कामगार सुरूवातीला आपले कारखानानिहाय संघ बनवतात. ते संघ या घडीच्या मागण्या मिळवण्यासाठी असतात. हलके हलके ते संघटन वाढत जाते व त्याला राष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त होते. लवकरच कामगार राजकीय मागण्याही करू लागतात. त्यासाठी ते आपला राजकीय पक्षही बनवतात. राजसत्ता हस्तगत करण्याची आवश्यकता त्यांना भासू लागते. दरम्यान त्यांची दुरावस्था, गरिबी, बेकारी वगैरे वाढलेली असते. मग क्रांती करून भांडवलशाही व तिचे राज्य उलथून पाडण्याखेरीज दुसरा मार्ग त्यांच्यापुढे उरत नाही. कामगारवर्ग भांडवलदारवर्गापुढे लढाईसाठी उभा ठाकतो. यावेळी कामगारवर्गाचे सामर्थ्य व संख्याबल खूप वाढलेले असते व भांडवलदारवर्गाचे खूप कमी झालेले असते.

भांडवलशाहीचा पराभव होतो आणि तिच्या जागी कामगारांचे राज्य येते. ही क्रांती शसस्र क्रांती असते आणि तिच्यामध्ये रक्तही सांडावे लागते. इंग्‍लंडसारख्या अपवादभूत देशांमध्येच ती शांततेनेही पार पडू शकेल असे मार्क्सला कालांतराने वाटू लागले. (पुढे लेनिनचे मत पडले की तोही अपवाद शक्य नाही) ही रक्तरंजित क्रांती यशस्वीपणे पार पाडावयाची म्हणजे कामगारांची जय्यत तयारी हवी. त्याचा शिस्तबद्ध व लढाऊ असा पक्ष हवा. तोच साम्यवादी पक्ष. असा पक्ष यूरोमधील औद्योगीक क्रांती झालेल्या प्रत्येक देशात उभा राहावा असे मार्क्सवादाचे उद्दिष्ट होते. विसाव्या शताकात मर्क्सवादाचा जगभर प्रसार झाला आणि अनेक देशांत मार्क्सवादी साम्यवादी पक्ष निर्माण झाले.

क्रांतीनंतर जी वर्गहीन समाजव्यवस्था निर्माण होईल तिच्याबद्दल मार्क्सने फारसे काही लिहिलेले नाही. साम्यवाद ताबडतोब स्थापन होणार नाही, हा इशारा मात्र त्याने स्पष्टपणे दिलेला आहे. संक्रमण काळात कामगारांची हुकूमशाही प्रस्थापित होईल असे मार्क्सने एके ठिकाणी जाता जाता लिहिले आहे. त्याच्या आधाराने नंतरचे बरेच मार्क्सवादी सध्या साम्यवादी देशांत रूढ झालेल्या हुमशाहीचे समर्थन करतात.

कामगारांची हुकूमशाही हे त्यांच्या दृष्टिने मार्क्सवादाचे एक महत्त्वाचे अविभाज्य अंग होय. मार्क्सला कामगारांच्या हुकूमशाहीला एवढे महत्त्व द्यायचे असते, तर त्याने त्या कल्पनेचा संपूर्ण ऊहापोह केला असता; एका वाक्यात नुसता उल्लेख करून थांबला नसता. शिवाय हुकूमशाहीची ही कल्पना मार्क्सवादाच्या एकंदर संकल्पनेशी विसंगत आहे. लोकशाहीला मार्क्सवादामध्ये मोठे महत्त्वाचे स्थान आहे. शेवटची क्रांतीदेखील बहुसंख्याकांची अल्पसंख्याकांविरुद्ध असेल, हे मुद्दाम आवर्जून सांगितले आहे. क्रांतीकारक साम्यवादी पक्ष संकुचित पंथ बनू नये, असा मार्क्सचा आग्रह होता. शेवटी त्याला नको होते तेच घडले ही गोष्ट वेगळी.

शासन व शोषण विरहित स्वतंत्र व समान व्यक्तींचा स्वातंत्र समाज हे मार्क्सवादाचे अंतिम उद्दिष्ट आहे. राज्य व शासन लागते ते वर्गीय समाजात; वर्ग नष्ट झाले, वर्गीय पिळवणूक नष्ट झाली, राज्याची व शासनाची गरज उरत नाही. मग माणसावर राज्य करायचे नसते, तर वस्तूंचे वाटप करायचे असते, प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे धन मिळावे व त्याच्या कुवतीप्रमाणे काम त्याने द्यावे, हे साम्यवादाचे स्वप्‍न होते; आणि अद्याप तरी स्वप्‍नच उरले आहे. एवढेच नव्हे, तर त्या भांडवलशाहीचे मरण मार्क्सवादाने सव्वाशे वर्षापूर्वी अपेक्षिले होते, ती आज देखील जिवंत असून उत्पादनाची नवनवीन तंत्रे व क्षेत्रे हस्तगत करत आहे. म्हणजेच इतिहास वेगळ्या चालीने चालला असून, त्या चालीचा व मार्क्सवादी भाकितांचा मेळ जमत नाही.

मार्क्सवादाची काही भाकिते खरी ठरली नाहीत. त्यांपैकी एक-दोन भाकितांचा उल्लेख या ठिकाणी प्रस्तुत ठरेल. औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या भांडवलशाही देशांत कामगार क्रांती अगोदर घडून येईल. असा मार्क्सवादाचा अंदाज होता. त्याप्रमाणे इंग्‍लंड, जर्मनी, फ्रान्स अगर अमेरिका या देशांत कामगार क्रांती अगोदर घडून यायला हवा होती; पण ती घडली १९१७ साली औद्योगीक दृष्ट्या मागासलेल्या रशियात. त्यानंतर पासष्ट वर्षे उलटून गेली तरी त्या चार देशांत साम्यवादी क्रांतीची चिन्हे दिसत नाहीत. यावरून धडा घ्यायचा तो एवढाच की उद्योगधंदे वाढले की कामगार क्रांतीप्रवण होतात, असे नाही.
भांडवलशाहीच्या वाढी

दुसराही एक अंदाज खोटा ठरला तो हा की भांडवलशाहीच्या वाढीबरोबर कामगारांचे दैन्य व दारिद्य वाढेल, ते घडलेले नाही. उलट कामगारांची परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे वर्ग कलह हा मर्यादित प्रमाणातच तेथे चालतो. त्यांची राहणी सुधारली आहे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते सुधारले आहेत. त्यांच्यासाठी कल्याणाच्या अनेक सोई व कायदे झाले आहेत. मार्क्सच्या काळात या गोष्टीला नुकतीच सुरूवात झाली होती. त्यात नंतर लोकशाहीच्या दडपणाखाली खूपच भर पडली. सर्वसाधारण जनतेबद्दल हे विधान असते, तर गोष्ट वेगळी; पण विधान आहे, ते कामगारांच्याबद्दल. ज्या पुढारलेल्या देशांतील कामगारांचा मार्क्सने अभ्यास केला, त्यांच्या बाबतीत तर ते मुळीच खरे ठरले नाही. मार्क्सचे असेच आणखी एक विधान खरे ठरले नाही, ते म्हणजे भांडवलशाहीच्या अंतिम अवस्थेत मध्यम वर्ग नाहीसा होणार व दोनच वर्ग राहणार; एक भांडवलदारांचा आणि दुसरा कामगारांचा. समाजाचे असे स्पष्ट विभत्तीकरण झाले नाही. भांडवलदार व कामगार नसलेला मध्यम वर्ग अस्तित्वात आहे एवढेच नव्हे, तर त्याचे महत्त्व वाढले आहे आणि वाढत आहे.

पण काही भाकिते खरी ठरली नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. कुणीही समाजशास्रज्ञ ज्योतिषी नसतो आणि त्याने काढलेले काही निष्कर्ष चुकिचे ठरले, तर त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान चुकीचे ठरत नाही. मार्कवादाच्या बाबतीत अत्यंत खेदाची गोष्ट ही आहे, की व्याक्तीस्वातंत्र्यवादी म्हणून ते तत्त्वज्ञान अस्तित्वात आले त्याच्या आधाराने ज्या नवीन राजवटी निर्माण झाल्या, त्या सर्व व्यक्तीस्वतंत्र्यविरोधी ठरल्या आहेत. मार्क्सवादाचे जे मोठे अपयश आहे ते हे आहे.

मार्क्सवादाविरुद्ध हल्ली खूप टिका होते. ती टिका केवळ भांडवलशाही मानणाऱ्यांकडून होते असे नाही. खुद्द मार्क्सवांद्यामध्येदेखील त्या तत्त्वज्ञानावर टीका फरणारे पुष्कळ निघाले आहेत. रशिया इ. साम्यवादी देशांत मार्क्सवादाविरुद्ध टीक करणे शक्य नाही; पण तिथेही काही धाडसी टीकाकार निर्माण झाले आहेत; त्यांना अर्थातच शासनाच्या रोषाला बळी पडावे लागले.

भारतातील पहिले प्रसिद्ध मार्क्सवादी एम्. एन्. रॉय यांचाही या बाबतीत उल्लेख करता येईल. वर्गवादांमध्ये गुंतून पडल्यामुळे मार्क्स व्यक्तीला विसरला, हा त्यांनी घेतलेला आक्षेप मूलगामी स्वरूपाचा आहे. मार्क्सवाद्यांमध्ये एक अधिक जहाल व क्रांतीकारक गट निर्माण झाला आहे. त्याला ‘न्यू लेफ्ट’ असे म्हणतात. त्यामध्ये हर्बर्ट मार्क्यून, चे गेव्हेरा, झां पॉल सार्त्र, फ्रान्स फनान इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या दृष्टीने विकसित देशांतील औद्योगीक कामगार आता क्रांतीकारक राहिला नाही; तो क्रांतीकारक वारसा ते तिसऱ्या जगातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, विद्यार्थ्यांना व इतरांना देतात. काही टीकाकार मार्क्सच्या उत्तर आयुष्यातील विचारांपेक्षा पूर्वायुष्यातील विचारांना अधिक महत्त्व देतात. त्या विचारांत सर्वात महत्त्वाचा विचार आहे, तो परात्मवादाचा (एलिएशनचा); त्यांमध्ये मानवतावाददेखील आहे. तोच खरा मार्क्सवाद असेही त्यांच्यापैकी काहीजण म्हणतात. इतरही अनेक टीकाकार आहेत; पण त्यांचा इथे उल्लेख करण्याचे कारण नाही.

मार्क्सवादाचे भांडवलदारी किंवा समाजवादी किंवा इतर असे कितीही टीकाकार झाले, तरी मार्क्सवादाने बजाविलेले ऐतिहासिक कार्य कुणालाही नाकारता येत नाही. मार्क्सवादाने समाजवादाला पहिल्या प्रथम शास्रीय बैठक दिली आणि त्याच्या पूर्तीसाठी क्रांतीचा मार्ग कसा चोखाळावा ते दाखवून दिले.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5710 +22