संशोधन आराखडा म्हणजे काय?www.marathihelp.com

संशोधन आराखडा म्हणजे काय?
संशोधन आराखडा म्हणजे संपूर्ण संशोधन करण्यासाठी अपेक्षित बाबींची सूत्रबद्ध केलेली मांडणी (रचना) होय.


संशोधन आराखडय़ाच्या पायऱ्या :


उत्तम संशोधनासाठी चांगल्या संशोधन आराखडा आवश्कता असते. चांगल्या आराखड्यासाठी संशोधनामध्ये करावयाच्या सर्व घडामोडीचा (पायऱ्या) अंतर्भाव संशोधन आराखड्यात येणे आवश्यक आहे. संशोधन आराखडा म्हणजे संपूर्ण संशोधन करण्यासाठी अपेक्षित बाबींची सूत्रबद्ध केलेली मांडणी (रचना) होय.
संशोधन आराखड्यातील पायऱ्या :-
(१) प्रस्तावना :- संशोधकला ज्या क्षेत्रामध्ये संशोधन करायचे आहे. त्या क्षेत्राशी निगडीत प्रथम समस्या जाणवली पाहिजे. समस्येची जाणीव झाल्यावर संशोधकाला त्या समस्येची मांडणी प्रस्तावनेच्या स्वरुपात करता आली पाहिजे. यासाठी संशोधकाला संबंधित क्षेत्रातील माहिती असणे आवश्यक आहे.

(२) संशोधनाची गरज व महत्व :- संशोधकाने संबंधित क्षेत्रातील समस्येची मांडणी केल्यानंतर त्या समस्येवर संशोधनाची गरज का आहे. हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या समस्येची सोडवणूक केल्यावर सामाजिक परिस्थिती नेमका कोणता बदल होणार आहे. व त्या समस्येच्या सोडवनुकीमुळे जन-सामान्य लोकांना त्याचा काय, कसा व कोणता फायदा होणार आहे. त्यामुळे या संशोधनाला प्राप्त होणारे महत्व संशोधकाला लक्षात घेणे गरजेचे आहे. व त्याची मांडणी महत्वात करणे गरजेचे आहे.

(३) समस्येचे विधान :- संशोधकाने ज्या समस्येची मांडणी प्रस्तावनेच्या स्वरुपात केली आहे. त्या समस्यचे रुपांतर समस्येच्या विधानात करणे आवश्यक आहे. या समस्या विधानात समस्येचे स्वरूप समाविष्ठ असले पाहिजे. समस्येचे प्रतिबिंब त्या विधानात दिसले पाहिजे. दुसरी बाब म्हणजे त्या समस्येची सोडवणूक कशा प्रकारे करणार आहात. हे देखील त्यातून स्पष्ट समजले पाहिजे. आणि संशोधकाची आभ्यास पद्धती त्यातून स्पष्ट दिसली पाहिजे. हेच समस्या विधान म्हणजे तुमच्या संशोधनाचे शीर्षक बनते.

(४) कार्यात्मक व्याख्या :- संशोधकाने समस्येची मांडणी समस्येच्या विधानात करून त्याचे संशोधन शीर्षक बनवले आहे. याचा संशोधकाने एक अर्थ गृहीत धरला आहे. हाच अर्थ जन-सामान्यांनी सुद्धा तसाच गृहीत धरला पाहिजे. यासाठी संशोधकाला त्या संशोधन शीर्षकच्या कार्यात्मक व्याख्या देणे आवश्यक आहे.

(५) संशोधनाची उदिष्टे :- संशोधनाचे काम करताना कोणकोणत्या बाबी अभ्यासायाच्या आहेत. व कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आपले संशोधनाला पूर्णत्व प्राप्त होईल. अशी सर्व संशोधकाला संशोधनाच्या उदिष्ठात मांडवी लागतात. परंतु संशोधनाची उदिष्ट मांडताना आपल्या विषयाचा आवाका लक्षात घेणे आवश्यक आहे. नाहीतर संशोधनाचे काम खूप किचकट व अवघड बनेल.

(६) गृहीतकृत्ये :- संशोधनातून अपेक्षित उत्तर हे संशोधकाला संशोधन पूर्ण होण्याअगोदर गृहीतकृत्याच्या स्वरुपात मांडावे लागते. परंतु गृहीतकृत्य मांडताना ती उदिष्टां अनुरूप असावी लागते. त्याच बरोबर गृहीतकृत्यांच्या आधारे आपल्याला माहिती विश्लेषणाची पद्धत देखील ठरवता येते. गृहीतकृत्यांनाच परिकल्पना देखील म्हणतात. यावरून त्याचे चार प्रकार पडतात. १) शून्य परिकल्पना २) संशोधनाची / धन परिकल्पना ३) ऋण परीकल्पना ४) प्रश्नार्थक परिकल्पना
१) शून्य परिकल्पना :- जेव्हा परीकाल्पनेत धन व ऋण बदल होतो हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा शून्य परिकल्पना असते. उदा.- एखाद्या विशिष्ठ योजनेमुळे व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होईल कि घट हे निश्चित सांगता येत नाही.
२) संशोधनाची / धन परिकल्पना :- एखाद्या विशिष्ठ योजनेमुळे व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होईल.
३) ऋण परीकल्पना :- एखाद्या विशिष्ठ योजनेमुळे व्यक्तीच्या उत्पन्नात घट होईल.
४) प्रश्नार्थक परिकल्पना :- एखाद्या विशिष्ठ योजनेमुळे व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होईल का ? किवा एखाद्या विशिष्ठ योजनेमुळे व्यक्तीच्या उत्पन्नात घट होईल का ?

(७) संशोधन पद्धती :- संशोधन करताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे संशोधन पद्धती. यात विविध प्रकार आहेत. परंतु सामाजिक शास्रतात ठराविक पद्धतींना महत्व आहे. १) सर्वेक्षण पद्धत २) विश्लेषणात्मक पद्धत ३) सैद्धांतिक (मुलभूत) पद्धत ४) गुणात्मक / संख्यात्मक पद्धत या चारही पद्धतींचा वापर आपण सामाजिक संशोधन करताना वापरू शकतो.

(८) जनसंख्या :- संशोधनाच्या विषयानुसार संशोधनाची जनसंख्या ठरत असते. संशोधन विषयाचा समग्र भाग ही जनसंख्या असते. उदा. अहमदनगर जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांचा आर्थिक व सामाजिक अध्ययन. या मध्ये जनसंख्या ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दारिद्र्य रेषेखालील लोक.

(९) नमुना :- संशोधनातील जनसंख्या पाहता, संशोधकाला नमुना म्हणून सर्व जनसंख्या नमुना म्हणून आर्थिकदृष्ट्या न परवडणारी आहे. शिवाय वेळखाऊ देखील आहे. यासाठी जनसंखेचे प्रतिनिधित्व करणारा जनसंखेतील एक भाग नमुना म्हणून निवडला जातो. या नमुन्याचे आलेले निष्कर्ष सर्व जनसंखेला लागू पडतात.

(१०) नमुना निवड पद्धत :- नमुन्याचे आलेले निष्कर्ष सर्व जनसंखेला लागू पडण्यासाठी शास्रोक्त पद्धतीने नमुन्याची निवड करणे आवश्यक आहे. या साठी काही पद्धती आहेत.
१) यादृच्छिक नमुना निवड पद्धतीनुसार :- १) लॉटरी पद्धत २) क्रम पद्धत ३) कोटा पद्धत
२) सहहेतुक नमुना निवड पद्धत :-
३) बहुस्तरीय नमुना निवड पद्धत :-
४) सोयीस्कर नमुना निवड पद्धत :-

(११) माहिती संकलनाची साधने :- संशोधानासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याच्या मुख्य दोन पद्धती आहेत.
१) प्राथमिक स्त्रोत :- प्रश्नावली, अनुसूची, मुलाखत व निरीक्षण.
२) दुय्यम स्त्रोत :- विषयाच्या संदर्भातील लिखित सर्व साहित्य. पुस्तके, मासिके, विश्वकोश, शासकीय अहवाल.

(१२) माहिती विश्लेषणाची साधने :- संकलित साहित्याचे विश्लेषण करण्यासाठी
१) गणितीय पद्धत - गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, टक्केवारी इ.
२) भूमितीय पद्धत – आलेख, तक्ते, आकृत्या इ.
३) संख्याशास्रीय पद्धत – टी टेस्ट, काय स्केयर, अनोव्हा, क्वारटाईल, एफ टेस्ट इ.

(१३) व्याप्ती व मर्यादा :- संशोधकाला आपल्या संशोधनातील मर्यादा स्वतः ठरवाव्या लागतात. विषय, स्थळ, वेळ-काळ, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मर्यादा संशोधकाला ठरवाव्या लागतात. प्रस्तुत संशोधन कितपत व्याप्त आहे. हे देखील संशोधकाला ठरवावे लागते.

(१४) संशोधनाची कार्यपद्धती :- संशोधन आराखड्यातील सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर संशोधनाची कार्यपद्धती विषद करणे आवश्यक आहे. यातून संशोधनाचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होते.

(१५) प्रकरण योजना :- संशोधन प्रबंधात एकूण कोणते व किती प्रकरणांचा समावेश आहे याची माहिती देणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रकरणात कोण कोणत्या बाबींचा समावेश होणार आहे. हे त्या त्या प्रकरणात समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्याशिवाय संशोधनाचा आराखडा संपूर्ण होत नाही.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 6th Dec 2022 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 4686 +22